अधिसूचनेच्या मागणीसाठी शिक्षकेतर कर्मचारी पुन्हा संपावर, दहावी बारावी परीक्षा आणि पेपर तपासणीवर परिणाम
तुळजापूर दि 14 प्रतिनिधी
महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाच्या अनुषंगाने राज्य सरकार बरोबर शिक्षकेतर संघटनांच्या प्रतिनिधींची यशस्वी चर्चा झाल्यानंतर चर्चेप्रमाणे शासन आदेश अध्याप काढण्यात आलेला नसल्यामुळे पुन्हा एकदा 14 मार्चपासून राज्यभरातील शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले आहेत याचा परिणाम धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जाणवला बहुतांश महाविद्यालयामध्ये शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले चित्र होते.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नळदुर्ग तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर या इतर महाविद्यालया मध्ये आपल्या मागण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेमध्ये शासनाने सर्व मागण्या मान्य केले आहेत परंतु आजपर्यंत शासनादेश काढलेला नसल्यामुळे शिक्षकेतर संघटनांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे आणि परीक्षेच्या काळात आणि पेपर तपासणीचे काम सुरू असताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे शिक्षण संस्था आणि प्राचार्य युनिट प्रमुख यांची मोठी तारांबळ या काळात उडणार आहे.
तुळजापूर येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर व तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर या दोन महाविद्यालयात 100% संप सुरू आहे या संपाला बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांनी भेट दिली आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने तातडीने सोडवाव्यात असे बोलून दाखवले.
शिक्षक सेनेचे मराठवाडा अध्यक्ष डॉ गोविंद काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल द्वारे निवेदन देऊन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करणारे शासन आदेश प्रसिद्ध करावेत असे यावेळी सांगितले या मागण्यांना माजी सिनेट सदस्य संभाजी भोसले कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा रमेश नन्नवरे यांच्यासह इतर प्राध्यापकांनी पाठिंबा दिला आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या संपाला आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे.