कॉमर्स शाखेतून करिअरच्या संधी – डाॅ.आनंद मुळे
दहावी नंतर पुढे काय? कॉमर्स शाखेतून करिअरच्या संधी कोणत्या आहेत? या प्रश्नांच्या उत्तरासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. 3 जून 2023 रोजी दहावी वर्गाचा निकाल लागतो आहे या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आपल्या करिअरमध्ये शिक्षणाची यशस्वी वाटचाल करण्यासाठी कोणत्या मार्गाने पुढे जावे याचे मार्गदर्शन करणारा हा लेख.
मागील काही वर्षापासून आपल्या देशातील जनता बँकिंग, विमा, बचत, गुंतवणूक, शेअर मार्केट या विविध क्षेत्राच्या बाबतीत कमालीची जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. बचत, गुंतवणूक, शेअर मार्केट हे विषय केवळ उच्चभ्रू वर्गात चर्चिले जात असत. परंतु, आत्ताच्या परिस्थितीत हे विषय अगदी मध्यमवर्गीय व सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे झाल्याचे दिसून येत आहेत. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रात झपाट्याने होत असलेली वाढ कॉमर्स शाखेतून शिक्षण घेतलेल्यासाठी करिअरची मोठी संधी उपलब्ध करून देणारी असणार आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण १२ वी कॉमर्स नंतर उच्च शिक्षणासाठी असणारे पर्याय व त्यातून असणार्या करिअरच्या संधी याची माहिती घेणार आहोत.
१) चार्टर्ड अकाउंटंट (CA)
सायन्स शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी ज्या प्रमाणे डॉक्टर अथवा इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सायन्स शाखेला प्रवेश घेतो. तसेच कॉमर्स शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट हे स्वप्न असते. चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी १२ वी नंतर Foundation, Intermediate, Internship व CA Final या चार स्टेज मधून जावे लागते. B. Com. नंतर CA करण्यासाठी Foundation Exam ची गरज लागत नाही. विद्यार्थी थेट Intermediate साठी प्रवेश घेऊ शकतो.
चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वतः कर सल्लागार (Tax Consultant), अंकेक्षक (Auditor) म्हणून व्यवसाय करण्यास मोठा वाव आहे. अनेक CA असलेल्या फर्म मध्ये पार्टनर म्हणून देखील करिअर करता येते. बहुराष्ट्रीय कंपनी, सरकारी कंपनी मध्ये मोठ्या पॅकेज च्या नौकरीची संधी निर्माण होते.
२) कंपनी सेक्रेटरी (CS)
खाजगी अथवा सार्वजनिक कंपनीचा सर्व प्रशासकीय कामकाज पाहणारा अधिकारी म्हणून कंपनी सेक्रेटरीची ओळख असते. बारावी नंतर पदवीचे शिक्षण घेत कंपनी सेक्रेटरी चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करण्याची मोठी संधी आहे.
३) बी. कॉम. / बी.बी.ए. (B. Com. / BBA)
मागील काही वर्षांमध्ये बँकिंग व विमा क्षेत्रामध्ये झपाट्याने झालेली वाट पाहता ग्रामीण व निम शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी बी. कॉम. अथवा बी.बी.ए. ची पदवी प्राप्त करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सध्या राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, विमा कंपन्या, विविध कारणांसाठी कर्जपुरवठा करणाऱ्या फायनान्स, मल्टीस्टेट, को-ऑपरेटिव्ह सोसायटी इ. वित्तीय संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज आहे. बी. कॉम ची पदवी घेताना अभ्यासलेल्या विविध विषयातील ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना वरील क्षेत्रात करिअर करताना नक्की होतो. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तीन अथवा चार वर्ष असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
४) डी.टी.एल. (D.T.L.)
कॉमर्स शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डी.टी.एल (डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ) ही पदविका घेऊन कर सल्लागार म्हणून व्यवसाय करण्याची मोठी संधी आहे. देशात जीएसटी ही कर प्रणाली लागू झाल्यापासून कर सल्लागार या प्रोफेशनला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
५) बी.सी.ए. (BCA)
बारावीनंतर कॉम्प्युटर क्षेत्रात करिअर करण्याची आवड असणाऱ्यांनी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन (B.C.A.) या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यास भविष्यात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी उपलब्ध होते. बी.सी.ए. या पूर्णवेळ अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सोबत अकाउंटिंग व व्यवस्थापन शास्त्राचे देखील ज्ञान प्राप्त होते.
६) एम.बी.ए. (M.B.A.)
व्यवस्थापन शास्त्रात करिअर करण्यासाठी एम.बी.ए. हा उत्तम पर्याय आहे. एमबीए मध्ये विद्यार्थी आवडीनुसार फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स, प्रोडक्शन यापैकी कोणत्याही क्षेत्रात उत्तम प्रकारचे करिअर निवडू शकतो. एम.बी.ए. नंतर स्वतःचा उद्योग सुरू केल्यास एम.बी.ए. मध्ये घेतलेल्या शिक्षणाचा व्यवसाय वृद्धीसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. एमबीए नंतर बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मॅनेजर पदावर काम करण्याची मोठी संधी आहे.
७) एम कॉम (M. Com.)
बी.कॉम. नंतर मास्टर्स करण्यासाठी एम.कॉम. हा उत्तम पर्याय आहे. एम. कॉम. नंतर शिक्षण क्षेत्रात काम करण्याची आवड असणाऱ्यांसाठी बी.एड., एम. फिल., पीएच.डी. असे पर्याय उपलब्ध आहेत.
८) एल.एल.बी. (LLB)
कायदा क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर पाच वर्ष व बी.कॉम. नंतर तीन वर्षाचा एल..एल.बी. चा अभ्यासक्रम पूर्ण करून वकिली व्यवसाय करता येतो. वकिली व्यवसायासोबत कर सल्लागार म्हणून व्यवसाय करण्यास मोठा वाव आहे.
९) इतर संधी
कॉमर्स शाखेतून शिक्षण घेत असताना विविध विषयाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधारे स्वतःचा उद्योग व्यवसाय स्थापन करून त्याला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचे बळ देखील प्राप्त होते. या व्यतिरिक्त हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, विमा प्रतिनिधी इत्यादीच्या माध्यमातून स्वतःच्या व्यवसायातून इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे क्षमता प्राप्त होते.
– डॉ. आनंद दत्ता मुळे ( M.Com., M.Phil.,GDC&A.,Ph.D.)लेखक हे कॉमर्स शाखेतील २० वर्ष अध्यापनाचा अनुभव असलेले तज्ञ आहेत.